वाहनाच्या धडकेत पादचार्‍याचा मृत्यू !

Foto

औरंगाबाद : घराकडून शेताकडे जाणार्‍या एका नागरिकाला भरधाव वाहनाने धडक दिली. यात गंभीर जखमी झालेल्या या नागरिकाचा उपचारादरम्यान रात्री मृत्यू झाला. ही घटना अजिंठा-जळगाव रोडवर गुरुवारी घडली.
  
सादिकखान बिस्मिल्‍लाखा मेवाती (वय 30 वर्षे, रा. अजिंठा) असे या अपघातात मृत्यू झालेल्या पादचार्‍याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून, सादिकखान हे गुरुवारी दुपारी अजिंठा-जळगाव रोडने शेताकडे जात होते. त्यादरम्यान रेणुका पेट्रोल पंपाजवळ समोरून आलेल्या भरधाव वाहनाने त्यांना धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले. अपघात होताच चालकाने घटनास्थळावरून पोबारा केला. सादिकखान हे रस्त्यावर पडल्याचे पाहून पेट्रोल पंपावरील नागरिकांनी त्यांना अजिंठा येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. प्रथमोपचार करून त्यांना येथील घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना रात्री त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी अजिंठा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस अपघातग्रस्त वाहनाचा शोध घेत आहेत.